तुमची शेतजमीन वर्ग दोनमधून वर्ग एकमध्ये करायचीय; तर तहसीलमध्ये अर्ज केला का?नसेल तर जाणून घ्या सर्व प्रोसेस! Varg 2 to Varg 1

Spread the love

Varg 2 to Varg 1:-जमीन मालकांच्या पिळवणुकीपासून कुळांचे,त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी कुळ वहिवाट अधिनियम अस्तित्वात आलेला आहे.मात्र,कुळ कायद्याने मिळालेली जमीन वर्ग- २ मधून वर्ग-१ कशी करायची आहे,याविषयी फारशी माहिती नसल्याने अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी आजही वर्ग दोनमध्येच आहेत.

या पृष्ठभूमीवर तहसीलद्वारे सध्या विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.या मोहिमेमुळे कुळ जमिनी वर्ग १ मध्ये करण्याची नामी संधी उपलब्ध झाली आहे.

महाराष्ट्र शासन,महसूल व वन विभाग,शासन निर्णय दिनांक ११ फेब्रुवारी २०१४ अन्वये मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ च्या कलम ४३,हैदराबाद कुळवहिवाट आणि शेतजमीन अधिनियम १९५० च्या कलम ५० (ब) व मुंबई कुळवहीवाट व शेतजमीन (विदर्भ प्रदेश) अधिनियम १९५८ च्या कलम ५७ नुसार ज्या जमिनीच्या संबंधात तिच्या खरेदीच्या किंवा विक्रीच्या दिनांकापासून १० वर्षांचा काळ लोटला असेल,

अशा कुळ जमिनींच्या बाबतीत,तिची विक्री करण्याकरिता,ती देणगी देण्याकरिता,तिची अदलाबदल करण्याकरिता,ती गहाण देण्याकरिता,ती पट्याने देण्याकरिता किंवा तिचे अभिहस्तांकन करण्याकरिता पूर्व परवानगीची अट शिथिल करण्यात आलेली आहे.

या पृष्ठभूमीवर १ जुलै २००४ पूर्वी ज्या शेतकऱ्यांना कलम ३२ म चे प्रमाणपत्र मिळालेले आहे,अशा शेतजमिनीच्या बाबतीत आकाराच्या ४० पट नजराणा रकमेचे चालान भरून घेऊन सातबारावरील नियंत्रित सत्ता प्रकार कमी करणे शक्य आहे.या आनुषंगाने चिखली तहसीलद्वारे १३ ते २७ मे या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

या मोहिमेत ज्या शेतकऱ्यांना/खातेदारांना कलम ३२ म चे प्रमाणपत्र १ जुलै २००४ पूर्वी मिळालेले आहे,अशा शेतकऱ्यांना धारण जमिनी भोगवटादार वर्ग २ मधून वर्ग १ करण्याची संधी उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांना सातबारा उतारा,३२ म चे प्रमाणपत्र व फेरफारसह अर्ज सादर करावेत व शासन निर्णयाचा लाभ घ्यावा,असे तहसीलदार संतोष काकडे यांनी सांगितले.

कुळाची जमीन वर्ग-१ कशी होते?

कुळाच्या जमिनीचं भोगवटादार वर्ग-२ मधून भोगवटादार वर्ग-१ मध्ये रूपांतर करण्यासाठी सातबारा उताऱ्यावरील संरक्षित किवा कायम कुळ ही नोंद काढण्यासाठी अर्ज कसा करायचा आणि नजराणा किती भरायची याची
तहसील कार्यालयातून माहिती घेतल्यानंतर संबंधित जमिनीचे सातबारा उतारे,फेरफार नोंदी,३२ म चे प्रमाणपत्र आदी कागदपत्रांसह तहसीलदारांकडे अर्ज केल्यानंतर तलाठी,मंडळ अधिकाऱ्यांकडून रिपोर्ट मागवला जातो.

या जमिनीसंबंधी कुणाला काही आक्षेप आहे का ते पाहण्यासाठी जाहीर प्रगटन दिलं जातं.संबंधित व्यक्तींना सुनावणीसाठी बोलावलं जातं.सगळं व्यवस्थित असेल तर जवळपास १ महिन्यांमध्ये ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होते आणि सातबारा उताऱ्यावरील कुळ निघून जाऊन भूधारणा पद्धतीत वर्ग- २च्या जागी, वर्ग-१ असे नमूद केलं जाते.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.तसेच वेळोवेळी आमच्या https://mhkhabar.com या वेबसाईट पोर्टलला भेट देत रहा.

Leave a comment