नमस्कार मित्रांनो आमच्या एमएचखबर वेबसाईट पोर्टल वर आपले स्वागत आहे.शाळेतील कमी पटसंख्या, त्यामुळे विद्यार्थ्यांना आवश्यक सोयीसुविधा पुरवण्यात येणाऱ्या अडचणी, कमी पटसंख्येमुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक भावना निर्माण न होणे अशी कारणे देत राज्य सरकारने २० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा, समूह शाळांमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे गाव तिथे शाळा या संकल्पनेला आता छेद जाणार असून, समूह शाळांचे प्रस्ताव सादर करण्यासाठी १५ ऑक्टोबरची मुदत देण्यात आली आहे.
शिक्षण विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यात १ ते २० पटसंख्येच्या १४ हजार ७८३ शाळा आहेत. त्यात १ लाख ८५ हजार ४६७ विद्यार्थी, तर २९ हजार ७०७ शिक्षक आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कमी पटसंख्येच्या शाळा बंद करून, समूह शाळा निर्माण करण्याची प्रक्रिया राबवण्याचे आदेश दिले आहेत.
या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी परिपत्रकाद्वारे राज्यातील सर्व शिक्षण उपसंचालक आणि शिक्षणाधिकारी यांनी समूह शाळा विकसित करण्याचे आदेश दिले आहेत. नंदूरबार जिल्ह्यातील तोरणमाळ, तर पुणे जिल्ह्यातील पानशेत येथे निर्माण करण्यात आलेल्या समूह शाळांच्या धर्तीवर राज्यात समूह शाळा विकसित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
हे पण नक्की वाचा:- कामगारांना सरकार दरमहा 3 हजार रुपये मानधन देणार
समूह शाळेमध्ये नवीन शैक्षणिक धोरण, इतर अभ्यासगटांनी दर्जेदार शिक्षणासाठी सुचवलेल्या १८ पायाभूत सुविधा, पहिली ते पाचवीसाठी प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्र शिक्षक आणि इयत्ता सहावी ते आठवीपर्यंत प्रत्येक विषयासाठी त्या विषयाचे तज्ञशिक्षक उपलब्ध असतील. याबरोबर संगणक खेळ व इतर कला यासाठी स्वतंत्र शिक्षक, प्रत्येक इयत्तेसाठी स्वतंत्र वर्ग खोली, त्याचबरोबर वाचनालय, संगणक कक्ष, विज्ञान प्रयोगशाळा, विविध कला संगीत यांसाठी बहुउद्देशीय कक्ष, खेळाचे मैदान-साहित्य, विद्यार्थी वाहतुकीसाठी बससेवा उपलब्ध करण्याबाबत नमूद करण्यात आले आहे.
कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये अपुऱ्या सुविधांमुळे शैक्षणिक प्रक्रियेत अडचणी येतात आणि त्यांचा विकासात अडथळा येतो. विद्यार्थ्यांना शिकण्याचा आनंद मिळत नसून, त्यांचे सामाजिकीकरण होत नाही. समूह शाळा विकसित करणे अनिवार्य नसून, शक्य असणाऱ्या ठिकाणीच त्यांची निर्मिती होणार आहे. हे करताना शिक्षकांची कोणतीही पदे कमी होणार नाहीत.
याउलट समूह शाळांमध्ये विविध प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध होतील. त्याचा फायदा विद्यार्थ्यांनाच होणार आहे, असे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी सांगितले. सध्या पानशेत आणि तोरणमाळ येथील समूह शाळा सुरू आहेत. तेथील पालक, शिक्षक आणि विद्यार्थी आनंदित आहेत. त्यामुळे या निर्णयाला अवास्तव विरोध करणाऱ्यांनी शाळांना प्रत्यक्ष भेट द्यावी आणि नंतरच विरोध करावा, असेही मांढरे म्हणाले.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉईन व्हा.