Corona JN.1
२०२० पासून अगदी २०२२ पर्यंत कोरोना,डेल्टा, ओमिक्रोन असे अनेक कोरोनाचे व्हेरीएंट त्यांची बदलती लक्षणे,उपाय अशा सगळ्या गोष्टी आपण अनुभवल्या आहेत.२०२३ मध्ये कोरोना संदर्भातील बातम्या तस्या फारच कमी होत्या पण आता वर्ष संपत असताना त्याच बातम्या सगळीकडे चर्चेचा विषय बनत आहेत.
सिंगापूर आणि चीन या ठिकाणी कोरोनाचा नवा व्हेरीएंट आल्याच्या बातम्या येत असताना आता आपल्या देशात केरळ,महाराष्ट्र आणि गोवा मध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असताना दिसत आहेत.JN.1 नावाचा नवीन व्हेरीएंट या तीन राज्यांमध्ये सापडल्याच्या बातम्या आल्या आहेत. सरकारी यंत्रणा देखील अलर्ट मोड वर आली असून खबरदारी घेण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.तसेच घाबरण्याची गरज नाही असे देखील सांगितले जात आहे.
कोरोना पुन्हा कसा आला?
देशामध्ये ज्या JN.1 या व्हेरिएंट बाबत चर्चा केली जात आहे त्याचे आतापर्यंत संपूर्ण भारतात २१ रुग्ण सापडले आहेत.त्यापैकी १९ रुग्ण गोव्यामध्ये,१ रुग्ण केरळमध्ये आणि १ रुग्ण महाराष्ट्रातील रत्नागिरी मध्ये सापडले आहेत. या व्हेरिएंट मुळे देशभरात आतापर्यंत कोणाचाही मृत्यू झालेला नाही.मात्र कोरोनाचे रुग्ण यापेक्षा जास्त आहेत.गेल्या २४ तासात देशात ६१४ नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत.त्यापैकी २४२ केरळमध्ये आहेत तसेच ४ रुग्णांचा मृत्यू देखील झाला आहे.तर महाराष्ट्रात २० डिसेंबर रोजी कोरोनाचे नवीन १४ रुग्ण सापडले आहेत.
सध्या वातावरणात झालेले बदल त्यामुळे सर्दी, इन्फ्लूएन्झा सारख्या आजाराचे नमुने देखील कोरोनाच्या तपासणी साठी पाठविले जात आहेत.कोरोनाची टेस्ट करणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ झालेली आहे त्यामुळे आकड्यामध्ये देखील वाढ होत आहे.
JN.1 काय आहे?
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे महासंचालक डॉ.राजीव बहल यांच्या मते पहिला JN.1 व्हेरिएंट केरळ मधील तिरुवनंतपुरम येथे आढळून आला.तिथे ७९ वर्षांच्या महिलेचा अहवाल पॉझीटीव्ह आला.त्या महीलेमध्ये इन्फ्लूएन्झा सारख्या आजाराची सौम्य लक्षणे आढळून आली मात्र नंतर ती बरी झाली.कोविड सब व्हेरिएंट JN.1 प्रथम युरोपियन देश लक्झेनबर्ग मध्ये ओळखले गेले इथून ते अनेक देशांमध्ये पसरू लागले.डॉक्टरांच्या मते हा व्हेरिएंट फार घातक नसून तो फार वेगाने पसरतो.४० पेक्षा अधिक देशांमध्ये तो आत्तापर्यंत पसरला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने या व्हेरिएंटला कोरोनाचा सब व्हेरिएंट अशी मान्यता दिलेली आहे.मानवाच्या शिंकेतून हा हवेत पसरला जातो.जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले की हा व्हेरिएंट आरोग्यासाठी धोकादायक नसून सध्याची लस या व्हेरिएंटवर प्रभावी असणार आहे.
JN.1 ची लक्षणे काय आहेत?
- थंडी वाजून येणे
- ताप येणे
- अतिसार
- खूप थकवा जाणवणे
- उलट्या
- सतत मायग्रेनचा त्रास
काय काळजी घ्यावी?
अशी लक्षणे आढळून आल्यास रुग्णांनी डॉक्टरांकडे जाऊन टेस्ट करून घ्यावी.ही लक्षणे बरे होण्यासाठी दोन ते तीन दिवस लागू शकतात.मात्र रुग्णाला पूर्ण बरे होण्यासाठी एक आठवडा लागू शकतो.यासाठी डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर घेऊन विश्रांती घ्यावी.वयस्कर लोकं आणि लहान मुलांनी यासंदर्भात जास्त काळजी घ्यावी असे सांगितले जात आहे.ज्यांना श्वसनाचा त्रास आहे त्यांनी देखील काळजी घेणे गरजेचे आहे.
JN.1 वर आधीची लस प्रभावी आहे का?
कोरोनावर आलेल्या लशी ज्या लोकांनी घेतल्या आहेत त्यांना या लशीचा धोका कमी असू शकतो.पण लस घेतली नाही त्यांना याचा धोका असू शकतो असे सांगितले जात आहे.केरळमध्ये ज्या ३० टक्के लोकांनी लस घेतली नाही त्यापैकी ३ टक्के लोकांना कोरोना आणि JN.1 चा संसर्ग झाला आहे.त्यामुळे लस प्रभावी ठरत असल्याचे दिसून येत आहे.बूस्टर डोस देखील घेणे सुरक्षित असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
या आजारावर उपाय आणि खबरदारी काय?
केंद्र सरकारने प्रत्येक राज्याला या व्हेरिएंट पासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे.त्याशिवाय संपूर्ण प्रशासनाला सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.कोरोना प्रकरणामध्ये अचानक वाढ झाल्यास सामोरे जाण्यासाठी भारताच्या आरोग्य मंत्रालयाने अनेक राज्यातील रुग्णालयांमध्ये मॉकड्रिलचे आयोजन केले आहे.राज्यांना दिलेल्या सूचनांनुसार हा व्हेरिएंट आरटीपीसीआर चाचणीद्वारे तपासला जाऊ शकतो.त्यामुळे आरटीपीसीआर चाचण्या मोठ्या प्रमाणावर करण्यात याव्यात अशी विनंती देखील करण्यात आली आहे.
ज्या रुग्णांना इन्फ्लूएन्झा आणि तीव्र श्वसनाचे आजार झाले आहेत अशा रुग्णांना जिल्हा रुग्णालयात विशेष देखरेखी खाली ठेवावे अशी सूचना करण्यात आली आहे.येणाऱ्या सण आणि उत्सवांच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी खबरदारी घ्यावी.लोकांनी खोकाताना किंवा शिंकताना योग्य ती काळजी घ्यावी असे सांगण्यात आले आहे.याशिवाय कर्नाटक राज्यात खबरदारी म्हणून सर्वांना मास्क सक्ती करण्यात आली आहे.
लोकांनी बाहेर पडताना मास्क वापरावा,हात धुणे, सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे.घरात राहणे आणि लसीकरण करणे हे कोविड टाळण्यासाठीचे साधे नियम पाळायला हवेत.तसेच परदेशातून कोणी आले असेल तर त्यांनी दोन दिवस होम आयसोलेशन मध्ये राहायला हवे. सध्याचा व्हेरिएंट जास्त धोकादायक नसला तरी खबरदारी घेण्यास सांगितले जात आहे.त्यामुळे काही लक्षणे जाणवल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेऊन विश्रांती घ्या.तसेच अफवांवर विश्वास ठेवू नका.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन व्हा.